१ जुलैपासून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ येथील मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निरीक्षण कार्यक्रमात २५ जुलै रोजी मतदार यादी प्रकाशन व २५ जुलै ते ९ ऑगस्ट पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. नमुना ६ चा अर्ज नव मतदार नोंदणी नमुना ७ अर्ज मतदारांची वगळणी मतदार यादीतील मतदारांचा तपशील दुरुस्ती करिता असे कार्यक्रम होतील. तसेच विशेष मोहीम बाबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखा २५ जुलै रोजी कळवल्या जातील असेही सांगितले. यामुळे आता निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने सर्व शासकीय यंत्रणा आता जोरदार कामाला लागली आहे.
२२ जुलै अखेर या मतदारसंघात १ लाख ५४ हजार ७४७ पुरुष तर १ लाख ४७ हजार ५८१ महिला आणि इतर ६० असे एकूण ३ लाख २३ हजार ८८ मतदार आहेत. तर आज अखेर १८ ते १९ वयोगटातील मतदार ४४६९ आहेत. याबाबत अंतिम मतदार यादी २० ऑगस्ट रोजी प्रसिद्धीला येईल अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांनी दिली. निवडणूक आयोगाने हा मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम निर्धारित केलेल्या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर स्वतः जातीने उपस्थित राहून हे कामकाज पूर्ण करणार आहेत.