लोकसभा निवडणुकीवर १४२ फिरत्या पथकांची करडी नजर! हॉटेल, ढाब्यांवर चित्रीकरण

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हाभरात १४२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये चित्रीकरणही केले जाणार आहे. सभा, पदयात्रा भेटीचेही होणार चित्रीकरण फिरती आणि स्थिर सर्वेक्षण पथके तयार आहेत. प्रत्येक सभा, बैठकांच्या ठिकाणी हजर राहून चित्रीकरण करतील. पदयात्रा, भेटी, बॅनर्स, कटआउट, वाहने यांचेही चित्रीकरण केले जाईल. हॉटेल, ढाबे, बार येथे अचानक चित्रीकरण होईल.

सांगली जिल्हा प्रशासनाने खर्च तपासणी, चित्रीकरण, भरारी, निरीक्षण पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या निश्चित केल्या आहेत. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत १४२ पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात २४ लाख २० हजार ४४ मतदार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी १८ लाख ४४ हजार ४५६ मतदारांची नोंदणी झाली आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांत मिळून २४२१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. निवडणूक काळात प्रचार सभा रॅली, बैठका यांचे छायाचित्रण करून खर्चाचा तपशील निश्चित केला जाणार आहे.विविध प्रक्रियांचे चित्रीकरण करण्याचे काम पथके करणार आहेत. आचारसंहिता कडक राहणार आहे. उमेदवाराच्या सभा, बैठकांसाठी झालेला खर्च, आचारसंहितेचे कोठे उल्लंघन झाले का, याची चाचपणी करण्यासाठी एकूण १४२ फिरती पथके जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केली आहेत.