मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी बेळगावात कँडल मार्च

महाराष्ट्रात मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी बेळगाव परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने कॅंडल मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी (ता. ५) सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर समाजातील नेते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने मराठा समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले.

सकल मराठा समाजाची जत्तीमठ येथे गुरुवारी (ता. २) बैठक झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, आर. एम. चौगुले, ॲड. एम. जी. पाटील, चंद्रकांत कोंडूसकर, शिवराज पाटील, मदन बामणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. त्या उपोषणाला पाठींबा तसेच रविवारी ५ वाजता कॅण्डल मार्च काढण्याचे दोन ठराव बैठकीत घेण्यात आले. रविवारी मोर्चा होणार असल्याने शुक्रवारी (ता. ३) व शनिवारी (ता.४) शहरात तसेच गावागावात जागृती करण्याचे जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली. तसेच शहरातील प्रत्येक फलकांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवावा असे आवाहनही करण्यात आले.

कॅंडल मार्चची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनाचे वाचन करण्याचा निर्णयही झाला. मराठा आरक्षणाला पाठींबा म्हणून बेळगावात धरणे आंदोलन, रास्ता रोको तसेच मशाल मोर्चा आदी सुचना कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या. त्यानंतर कॅंडल मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी दोन दिवसात पोलिस विभागाची परवानगी घेतली जाणार आहे.

बोलताना मालोजी अष्टेकर म्हणाले, महाराष्ट्राला आरक्षण मिळाल्यास त्याचा आम्हालाही लाभ मिळेले ही अपेक्षा आहे. कुणबी तसेच मराठा या सर्वांना मराठा आरक्षणाला लाभ व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाच्या मागे बेळगावातील मराठी व मराठा आहेत. मागील पिढीला आरक्षण नसल्यामुळे त्रास झाला. यानंतर तरी आरक्षण मिळेल व कोणत्याही समस्या येणार नाहीत. मराठ्यांनी एकत्रीत लढा दिला पाहिजे.

प्रकाश मरगाळे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचा आमच्या लढ्याला देखील हातभार लागेल. त्याला आमचा पाठींबा आहे. आरक्षणाचा प्रश्‍न संपल्यावर त्यांनी बेळगावला येण्याचे किंवा आम्ही त्यांनी भेटण्याचे नियोजन करावे लागेल. असेही ते म्हणाले. यानंतर आर. एम. चौगुले, गुणवंत पाटील, मदण बामणे, नेताजी जाधव, रणजीत हावळाण्णाचे, अनिल पाटील, मोतेश बारदेशकर, गणेश दड्डीकर, संजय मोरे, रवी पाटील आदींनी विचार मांडले.