बोरगावात वानराचा हल्ला! वनविभागाकडून दुर्लक्ष 

वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे वानराचा दोन महिन्यांनंतर पुन्हा धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या वानराने चार शेळ्यांच्या पिल्लांचा चावा घेऊन जीव घेतला. या घटनेबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी नागरिकांनी संपर्क साधला असता याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पिसाळलेल्या माकडाने गावात धुमाकूळ घालून अनेक लोकांना गंभीर जखमी करून जायबंदी केले होते.

ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बोरगाव हायस्कूल, गंजीखाना परिसरात पिसाळलेल्या वानराने पुन्हा धुमाकूळ घालून दत्तात्रय निवृत्ती पाटील यांच्या चार शेळ्यांच्या पिलांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याने ती पिल्ले मृत झाली तर अनेक मोठ्या शेळ्यांचा ही चावा घेतला आहे. गंजी खाणा येथील सिकंदर चांद मुल्ला यांच्या वस्तूवरील लहान दोन शेळीच्या  पिलांचा चावा घेऊन त्यांना ही गंभीर जखमी केले आहे. या शेळ्यांवर इस्लामपूर पशुवैद्यकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार केले. या प्रकाराबाबत इस्लामपूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीने व संबंधित शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती दिली असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.