महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या जातीचे लोक वास्तव्यास आहेत. शासनाकडून त्या त्या समाजातील समस्या सोडविण्यासाठी निधी देखील मंजूर केले जातात. आटपाडीत नुकताच जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. पडळकर हे लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील मागासलेल्या धनगर समाजासाठी सुभेदार मल्हार होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून ५०० कोटी रुपये निधी द्या अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेट घेऊन केली.
पडळकर यांनी राज्यातील धनगर, भटक्या जमातीच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या. त्यांना निवेदन दिले. त्यात पडळकर यांनी ७५ वर्षांपासून धनगर समाज उपेक्षित, मागासलेला राहिल्याची खंत व्यक्त केली आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या वाटा मोकळ्या होऊ लागल्या आहेत. त्यांना तसे वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे.
समाजाचे सांस्कृतिक संवर्धन आणि नावीन्यपूर्ण शिक्षणाचा संगम घडवणाऱ्या संस्थेची आवश्यकता व्यक्त केली. सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करून संस्थेला पाचशे कोटी रुपये निधी द्यावा. इतर मागास वर्गातील धनगर, भटक्या विमुक्त जमातीच्या समस्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. केंद्राच्या सूचीत समाजाला ओबीसी म्हणून गणले जाते. मात्र लोकसंख्या, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रश्न वेगळे आहेत. बहुसंख्य जाती-जमाती आजही गावकुसाबाहेर, भटके जीवन जगत आहेत. त्यांच्या समस्या शैक्षणिक, आर्थिकच नाही. समाजाचे मागासलेपण अद्यापही कायम आहे.
धनगर समाजासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करून भरघोस निधी देणे आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या, प्रश्नांचे सखोल संशोधन करून त्यावर आधारित धोरणे तयार करावीत. समाजाच्या विकासासाठी नवीन उपाय शोधता येतील. शैक्षणिक, शासकीय प्रगती होईल. तरुणांना प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी सक्षम प्रशिक्षण द्यावे. उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. समाजाच्या स्थलांतराच्या समस्येचे निराकरण करावे. समाजाला आत्मसन्मान, जागृती निर्मिती होणार असल्याची भावना व्यक्त केली.
