सध्याच्या काळात फसवणुकीच्या प्रकारात भरमसाठ वाढ होत असल्याचे चित्र दिसतच आहे. अगदी चुटकीसरशी चोरटे फसवणूक करताना पहायला मिळत आहे. आटपाडी येथे अशीच एक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आटपाडी येथील वृद्धाला दोघा अनोळखी भामट्यांनी हातोहात गंडविले. त्यांची २५ ग्रॅमची सोन्याची खरी चेन घेऊन बदल्यात १०० ग्रॅमचे खोटे सोन्याचे बिस्किट देऊन गंडवल्याचा प्रकार येथे घडला.जादा सोन्याचे आमिष वृद्धाच्या अंगलट आले. फसवणूकप्रकरणी शिवाजी महादेव चव्हाण यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी चव्हाण (वय ८५ रा. सोनार सिद्धनगर, आटपाडी) बाजारासाठी आले होते. बाजार करून सायंकाळी साडेचार वाजता चालत घरी चालले होते. सिद्धनाथ थिएटरजवळ अनोळखी पन्नास वर्षीय व्यक्ती त्यांच्याजवळ आली. त्याच्या एका जोडीदाराचे सोने हरवल्याचे सांगून तेथेच थांबायला सांगितले.
काही वेळाने दुसरी व्यक्ती तिथे येऊन हरवलेले सोने सापडल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी संबंधित वृद्धाला जवळ असलेल्या बाकड्यावर बसण्यासाठी घेऊन गेले. तिथे गेल्यावर त्यांनी हरवलेले सोने सापडल्याचे सांगून १०० ग्रॅम सोन्याचा पिवळ्या धातूचा तुकडा दाखवला. तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन आम्हाला द्या आणि आमच्याकडील १०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्किट घ्या, अशी गळ घातली. संबंधित वृद्धाला जादा सोन्याचे आमिष दाखवून दोघांनी त्यांची २५ ग्रॅमची सोन्याची चेन घेऊन पोबारा केला. घरी येऊन सोन्याचे बिस्किट म्हणून दिलेला धातूचा तुकडा घरच्यांना दाखवल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघड झाले.