राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात जागावाटपासाठी रणनीती आखली जात आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम सुनावणी घेऊन निकाल देणं अनिवार्य राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची पुढच्या दोन महिन्यांमध्ये दोन वेगवेगळ्या दिवशी सुनावणी होणार असून त्या दिवशी कोर्टात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे सुरुवातीला दोन्ही प्रकरणांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत होती. पण आता या दोन्ही याचिकांच्या सुनावणीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा नवीन तारखा समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातील कम्प्युटर सिस्टीमवर सुनावणीच्या पुन्हा नवीन तारखा दाखवण्यात आल्या आहेत. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी 6 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
तर यापूर्वी 3 सप्टेंबरला ही सुनावणी होणार होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची 3 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही सुनावण्या वेगवेगळ्या झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवल आहे. त्यांनी त्याचवेळी मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि मूळ राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवारांची असा निकाल दिला. या दोन्ही निकालावरुन सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यातच आहेत. त्यामुळे 3 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण करुन, 30 सप्टेंबरपर्यंत अपात्रतेचा निकाल लागेल, अशी शक्यता आहे.