खानापूर – आटपाडीत नेतेमंडळींच्या दुसऱ्या पिढीत लढत

विटा-खानापूर या दोन तालुक्याचा मिळून तयार झालेला खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघ. लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना होण्यापुर्वी हे दोन तालुके पंढरपूर लोकसभा मतदारसंघात होते, आता मात्र सांगली लोकसभा मतदार संघात आहेत. यानंतर या मतदार संघाची राजकीय पुनर्रचनाच झाली. स्व. आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात मोलाची साथ केली. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे या मतदार संघावर बारकाईने लक्ष आहे. बाबर यांचे वारसदार म्हणून सुहास बाबर पुढे आले आहेत. यापुर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सामाजिक व राजकीय कामाचे धडे त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले आहेत.

वडिलांच्या निधनानंतर त्यांना राजकीय वारसदार म्हणून शासन दरबारीही चांगली साथ मिळत आली असून कोट्यावधींचा विकास निधी शासनाकडून मिळाला असून टेभू योजनेच्या विस्तारित कामाना या कालावधीत मंजुरी मिळाल्याने पाणीदार आमदारांचे पाणीदार वारसदार म्हणून ते मतदारांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत.दुसर्‍या बाजूला माजी आमदार पुत्र आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही कोणत्याही स्थितीत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष असले तरी त्यांनी महायुतीमध्ये जागा मिळणार नाही असे गृहित धरून खा.शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जर शिवसेना ठाकरे पक्षाला जागा मिळाली तर हाती मशाल घेण्याची तयारीही ठेवली आहे. यामुळे या मतदार संघामध्ये बाबर विरूध्द पाटील ही पारंपारिक लढत अपेक्षित आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे गाव आटपाडी तालुक्यात असल्याने त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर हेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. बाबर यांना सहानभुती सध्या दिसत असली तरी आटपाडीचे वजन कोणाच्या बाजूला राहते यावर यशापयशाचे गणित अवलंबून राहणार आहे.