स्वर्गीय आम. अनिल बाबर यांनी विटा शहरातील सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी दि. २२ एप्रिल २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांची व नगरविकासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. स्वर्गीय आ. बाबर यांनी सभागृहातही याविषयी सातत्याने आवाज उठवला होता.
सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार विटा शहर सुधारित नळपाणी पुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विटा शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून रु. ८७ कोटी रुपये योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.