इचलकरंजीत शिवसेनेतून राहूल आवाडेंना उमेदवारीची….

इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करीत असलेले राहुल आवाडे यांनी काही महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढविली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आपल्या मुलाची उमेदवारी इचलकरंजी विधानसभेसाठी प्रकाश आवाडे यांनी यापूर्वीच जाहीर केल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली.

ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच राहुल आवाडे हे कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात राहिले. अनेक गोष्टीच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यांची सलगी वाढवण्याचे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमात तर राहुल आवाडे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ दिसले.यामुळे उमेदवारीसाठी त्यांचे नाव शिवसेनेतून जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधी पक्षांना मतदार संघातील राजकीय गणिते नव्याने मांडणी करावी लागणार आहे.

त्याचबरोबर राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्हापूर ते मुंबई असा विमान प्रवास केला. या प्रवासादरम्यान राहुल आवाडे यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाली. त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती मतदारसंघातील वातावरण आदींचा सविस्तर आढावा घेतला असल्याचे समजते. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. महायुतीमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे, याची माहिती आवाडे राहुल यांना आहे.


इचलकरंजी विधानसभा मतदार संघांमध्ये आवाडे कुटुंबीयांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आवाडे कोठे असतील तिथे हे मतदार असतात. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्वच नेते प्रयत्नशील होते. शिंदे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जिंकला आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढली. त्या ताकतीला आवाडे यांचे जास्तीत जास्त बळ मिळाले तर शिवसेनेचा आमदार इचलकरंजीतून निवडून येऊ शकतो, हे ओळखून आवाडे यांना शिवसेनेतून संधी दिली जाऊ शकते.