कोल्हापुरात उद्या रविवारी मराठा आरक्षण परिषद

प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची भूमिका आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या रविवारी २३ फेब्रुवारीला कोल्हापुरात मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे. यावेळी राज्यातील विविध 42 संघटनांचे प्रतिनिधींचे चर्चासत्र होणार असल्याची माहिती या परिषदेचे निमंत्रक तथा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रदीर्घकाळापासून लढा सुरू आहे.

मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती, सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने राज्यभरात 50 पेक्षा अधिक मोर्चे काढले. याप्रश्नी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी लढा सुरू केला; मात्र शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी दि. 23 सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात मराठा समाज आरक्षणसंदर्भात प्रलंबित प्रश्न, पुढील भूमिका व दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील विविध 42 मराठा आरक्षण संघटनांचे पदाधिकारी, मराठा आरक्षण विषयावरील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.