मित्रानो सध्या सगळीकडेच पावसाचा जोर सुरु आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त वाढतो. सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, यांसारख्या आजारांसोबत अनेक संसर्गजन्य आजारही पावसाळ्यात वेगाने पसरतात. पावसाळ्यात भिजायला मज्जा वाटते मात्र भिजल्यामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन म्हणजेच (बुरशीजन्य) आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं.
त्वचा नेहमीच कोरडी ठेवा
पावसाळ्यात जास्त ओलाव्यामुळे स्किनवर बुरशीची वाढ जास्त होऊ शकते. ज्यावेळी आपण पावसात भिजून येतो त्यांनतर आपली त्वचा पुसून कोरडी करावी.
मीठाच्या पाण्यात पाय बुडवावेत
बाहेरून पावसातून भिजून आला असाल तर अस्वच्छ पाण्यामुळे पाय खराब झाले असतील किंवा काही इन्फेक्शन झालं असेल तर हा उपाय घरी नक्की करून बघा. घरी आल्यावर पहिले पाय धुवा. नंतर एका टबमध्ये किंवा बदलीमध्ये तुम्हाला सोसवेल इतकं गरम पाणी घ्या त्यात २ चमचे मीठ घाला. त्यानंतर त्यात पाय बुडवून बसा. पाय मिठाच्या पाण्यात अर्ध्या तासांसाठी ठेवावे. नंतर पाय बाहेर काढल्यानंतर पाय नीट पुसून कोरडे करावे.
पुरेसे पाणी प्या
सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.