सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा नियोजन बैठकीत फक्त गोंधळ पाहायला मिळाला. एकनाथ शिंदें शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.खासदार ओमराजे निंबाळकर हे बोलयाला लागल्यावर शिंदे गटाचे मनीष काळजे यांनी खडेबोल सुनावले आणि डीपीडीसीच्या बैठकीत खासदारांना बोलण्याचा अधिकार नाही असे सांगितले.
मोहोळ येथील अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात म्हणजेच अनगर येथे स्थलांतर झाले आहे, तो देखील मुद्दा ऐरणीवर आला. यावरुन अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्यामुळे मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालय अनगर गावात गेले, अशा घोषणा देत जिल्हा नियोजन बैठकीत निषेध करत राडा झाला. विशेष म्हणजे सत्तागटातील नेत्यांत खडाजंगी पाहायला मिळाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
मोहोळ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात मंजूर झाल्याने मोहोळमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. एकनाथ शिंदे गटाचे चरणराज चवरे आणि मोहोळ तालुक्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमक टोकाला जात दोघे हमरीतुमरीवर आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या आमदारांचा निषेध करण्यात आला.