हातकणंगले तालुक्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवली जाणार

हातकणंगले तालुक्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून, ता. ०१ मार्च २०२५ पासून आरबीएसके २.० हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ०१ मार्च रोजी ए. पी. मगदूम हायस्कूल, माणगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामीण रुग्णालय हातकणंगलेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. दातार, माणगावचे सरपंच राजू मगदूम, स्थानिक लोकप्रतिनिधी, रा.बा.स्वा.का. हातकणंगले तालुक्यामधील सर्व वैद्यकीय पथके, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

सदर दिवशी शाळेतील ६०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ता. ०१ मार्च ते ३१ मार्च २०२५ या काळात हातकणंगले तालुक्यामध्ये, अंगणवाडी व शाळेतील बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय इचलकरंजी मधील २ पथके, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय मधील ०१ पथक, ग्रामीण रुग्णालय हातकणंगले मधील ३ पथके तर ग्रामीण रुग्णालय पारगावमधील २ पथके इत्यादींचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार तर विशेष आजाराच्या मुलांना संदर्भ सेवा दिली जाणार आहे. यात जन्मजात व्यंग, कमतरता, आजार व विकासात्मक विलंब शोधून त्यांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.