नव्या वर्षात राजकीय उलथपालथीने नवी समीकरणे जुळणार कि पुन्हा नवी समीकरणे निर्माण होणार? 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे आपणाला पहायला मिळाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय उलथा पालथं झाल्याचे चित्र सगळ्यांनीच पाहिले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात झाला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन आले. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने महायुतीसमोर आव्हान उभा केली. संकटावेळी सोबत आलेल्या खासदारांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी देऊन भाजपला जागा वाटपात धोबीपछाड दिला. दिलेला शब्द पूर्ण करत शिंदे यांनी दोन विद्यमान खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडी पुढे आव्हान निर्माण केले.

मात्र सत्ता बदलामुळे काहीशी नाराजी असलेल्या महायुतीच्या उमेदवारांपुढे विजयासाठी मोठी कसरत करावी लागली. महाविकास आघाडीकडून हातकणंगले मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांनी प्रचारात आघाडी घेतली. लोकसभा निवडणूक निकालात हातकणंगले महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांनी मिळवत गड राखला. तर कोल्हापूरच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रचंड मताधिक्काने महायुतीचे संजय मंडलिक यांचा पराभव केला.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारावून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात तगडे उमेदवार शोधले. पण ज्या मतदारसंघात निभाव लागणार नाही अशा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आयात केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत नाराजी काही मतदारसंघात उफाळून आली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल मिळणार या आशेने इच्छुकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षात प्रवेश केला. कागल आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतून दाखल झालेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे आणि आमदार के पी पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवारी मिळवली. राधानगरीतून के पी पाटील यांना ठाकरे यांचा शिवसैनिक सोबत घेऊन जाता आला नाही.

जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे राजकारणातील वाढते महत्त्व रोखण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी केलेले एकत्रितपणे प्रयत्न सफल ठरले. पाटील यांना खिंडीतच रोखून त्यांच्या महत्त्वकांक्षांना ब्रेक देण्याची काम जिल्ह्याच्या नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळणार आहेत.

शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुढे मोठी आव्हाने असणार आहेत. केवळ अस्तित्वाला शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यापुढे नेतृत्वाची कमतरता, आणि एकीचे बळ टिकवणे हेच आव्हान असणार आहे. तर काँग्रेस पुढे नेतृत्वच टिकवणे आव्हान असणार आहे. महायुती मधील भाजप आणि शिवसेनेमधील पक्षांतर्गत नाराजी रोखण्याचे आव्हान नवीन वर्षात असणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा नवी समीकरणे निर्माण होणार आहेत.