उद्धव ठाकरे यांच्या त्या आदेशामुळे दोन्ही गट आमने-सामने

उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना एक आदेश दिला. त्यांनी या सभेत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी अत्यंत जहाल भाषेचा वापर केल्यानंतर भाजपने पण तिखट प्रतिक्रिया दिली. शिंदे सेना बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह गेले. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाले. आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत.

शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. विधानसभेच्या तोंडावर मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.पुण्यात 3 ऑगस्ट रोजी पक्षाचा मेळावा झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी सभेच्या अखेरीस शिवसैनिकांना एक आदेश दिला. शाखा-शाखांतील बोर्डावर जी धनुष्य-बाणाची निशाणी आहे, ती हटवा आणि त्याठिकाणी मशाल चिन्ह लावा, असा आदेश त्यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांना दिला. त्यांच्या या आदेशामुळे ज्या ठिकाणी शाखेवरुन वाद सुरु आहे अथवा ज्या ठिकाणी दोन्ही गट मजबूत आहे, तिथे वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

यापूर्वी पण शाखांवरुन दोन्ही गटातील पदाधिकारी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट ठाकरे गट आमने-सामने आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायच्या कामाला लागले आहेत. परंतु यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट अनेक भागात आमने-सामने आले. प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती झाली आहे.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या तिथे धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.