करारा जवाब… आमच्यासोबतही तेच घडलं, लोकसभेतील आकडेवारी देत देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना चोख प्रत्युत्तर

कोल्हापूरमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी देत काही प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 80 लाख मतं पडली तरी त्यांच्या 16 च जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं पडली काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मत पडली तरी त्यांच्या 57 जागा आल्या असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला झालेल्या मतदानाची आकडेवारी देऊन चोख प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

‘श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?  चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,  भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.’

शरद पवार यांनी काय म्हटलं होतं? 

आम्ही विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी काढली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 लाख मतं पडली तरी त्यांच्या 16 च जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं पडली काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मत पडली तरी त्यांच्या 57 जागा आल्या. अजित पवार गटाला 58 लाख मतं पडली तरी त्यांच्या 41 जागा आल्या आणि आम्हाला 72 लाख मत पडून आमच्या केवळ दहा जागा आल्या. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.