कोरोची ग्रामपंचायतीतर्फे पाणीपट्टी व घरफाळा वसुली मोहीम सुरु

कोरोची येथील ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टी वसुलीची मोहीम मंगळवारपासून हाती घेतली. थकबाकीदार कारखानदार, उद्योजक व नागरिक यांच्या घरी जाऊन वसुली सुरू केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. काही कारखानदारांनी ग्रामपंचायतीत येवून थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका दिवसात ३ लाख ४५ हजार रुपये कर वसुली झाली आहे.

कोरोची ग्रामपंचायतीच्या वसुली मोहीमेमध्ये ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे व त्यांच्या पथकाने थकबाकीदार कारखानदार व ग्रामस्थ यांच्या घरी जाऊन त्यांना २४ तासांचा अवधी देत थकीत घरफाळा-पाणीपट्टी भरून सहकार्य करावे अन्यथा बुधवारी ७ रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर जे कोणी थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरली नाही, त्याचा पोलीस बंदोबस्तात व्यवसाय व कारखाना सील केला जाईल. जोपर्यंत थकित घरफाळा व पाणीपट्टी भरत नाही, तोपर्यंत कारखान्याला टाळे ठोकून सील केले जाईल, असा इशारा ग्रामविकास अधिकारी गडदे यांनी दिला.