मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली सोमवारी अहमदनगरमध्ये धडकणार…..

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने तातडीने सगेसोयरेंची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात केली आहे. या शांतता रॅलीला लाखो मराठा बांधवांची गर्दी होत आहे. या गर्दीला संबोधित करत मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत.

आता मनोज जरांगे यांची शांतता रॅली 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रॅलीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आजच्या दिवसाची तासिका इतर दिवशी भरून काढवीत, असेही आदेशात म्हटले आहे.