वाळवा तालुक्यातील कामेरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा आज शुक्रवार १७ मे व शनिवार १८ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. भैरोबाच्या नावानं चांगभलं… च्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडते. वाळवा तालुक्यातील कामेरी वा येथील भैरवनाथाची यात्रा बगाड (लाकडी गाडा) व स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लक्षवेधी होते.
भैरवनाथ यात्रेनिमित्त काढण्यात येणाऱ्या या बगाडाचा मान भरुगडे, करवडे, शेळके, डंके पोलीस पाटील यांच्या भावकीचा आहे. परंतु सध्या त्यांच्यासह गावातील सर्वच लोक एकत्रित यात्रा साजरी करतात.यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे बगाड. बगाड म्हणजे एक प्रकारचा लाकडी गाडा. पूर्वी बगाडाला दगडी चाके होती. ५० फूट उंचीचे शीड होते व बगाडास आठ ते दहा बैलजोड्या जुंपल्या जात होत्या. कालांतराने यामध्ये बदल झाला.
सध्या या बगाडाला लाकडी चाकांचा वापर केला जात आहे. ५० फूट उंचीचे शीड विजेच्या तारांना घासू लागल्याने त्याची उंची कमी करून ३५ फूट केली आहे. या शिडाला ग्रामस्थांकडून नवसाच्या नारळाची तोरणे बांधली जातात व या बगाडाला ते ८ बैलजोड्या जुंपल्या जातात.
यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भैरवनाथ मंदिर ते हनुमान मंदिर या मार्गावरून यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या बगाडाच्या फेऱ्या काढण्यात येणार आहेत.
त्यानंतर रात्री पालखी काढली जाते. हलगी- ढोल-ताशासह पारंपरिक वाद्यांचा वापर करून यात्रा साजरी करावी, यात्रेदिवशी भैरवनाथ मंदिर ते हनुमान मंदिर या बगाड मार्गावर साऊंड सिस्टिम न लावण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
शनिवार १८ मे रोजी सकाळी व रात्री ९ वाजता सौ. छाया वीरकर तमाशा मंडळ कराड यांचा लोकनाट्य तमाशा तर रविवार १९ मे रोजी रात्री ९ वाजता लवंगी फटाकडी हा लावण्यांचा कार्यक्रम बाजारपेठ कामेरी येथे होणार आहे.
