Ganeshotsav 2024 : गणेश मूर्तींच्या किमती यंदा १५ टक्क्यांनी वाढणार!

आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी आत्तापासूनच सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. मूर्ती घडविण्यासाठी शिल्पकार, कामगार अहोरात्र एक करून काम करत आहेत. यंदा राज्यभरातून मुंबईतील मूर्तीकारांच्या मूर्तींना मागणी गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. तसेच मूर्ती निर्मितीच्या कच्च्या मालाच्या,शाडू मातीचा व सजावटीच्या साहित्याच्या दरातही वाढ झाल्याने यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज मुर्तीकारांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळ यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची स्थापना होत असते. मुंबईतून हजारों गणेशमूर्तींची विक्री होत असल्याचे मुर्तीकारांनी सांगितले.

सध्या दक्षिण मुंबईतील लालबाग, परळ,चिंचपोकळी भागात अनेक मूर्तिकार श्रींची मूर्ती बनवण्यात मग्न आहेत. जवळजवळ सर्व ठिकाणी गणेश मुर्ती घडवण्याचे काम अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. अर्ध्या फुटापासून ४५ फुटापर्यंत उंचीच्या विघ्नहर्ताच्या वेगवेगळया रूपातील मूर्तींना यंदा चांगली मागणी आहे. कमीत कमी लहान मूर्तीची किंमत १ हजारांपासून सुरू होते तर सर्वात मोठी ४५ फुटांच्या मूर्तीची किंमत कलाकृतीनुसार लाखाच्या घरात असते. या सर्व मूर्तींचे सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या गणेशोत्सवात अयोध्यातील प्रभू श्रीराम यांच्या रुपातील मूर्ती साकारण्यात आली आहे.

त्याचबरोबर लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी, केदारनाथ, विट्ठल,नंदीवरील गणेशमूर्ती,प्रभू श्रीराम,भगवान हनुमान अवतारातील आणि विविध रुपातील आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत. तसेच, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालगणेश आणि इतर विलक्षण संकल्पनेतून साकारलेल्या श्रींच्या सुंदर मुर्ती तयार करण्यात येत आहेत. वेगवेगळ्या आकारानुसार, उंचीनुसार, शिल्पकलेनुसार आणि आवडत्या रुपात आकर्षक मुर्ती घडवताना खर्च पण तितकाच येतो.