इचलकरंजी, येथील गणेशनगर परिसरात एका युवकास जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेत तातडीने भागात सर्व्हे करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली. गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाला जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाली असून त्याच्यावर सध्या सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जीबीएस सदृश्य आजाराचा शहरात पहिलाच रुग्ण आढळून आल्याने गणेशनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्शवभूमीवर नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील आणि आरोग्यधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांची भेट घेतली. महापालिकेकडून भागात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि भागाचा सर्व्हे करावा अशी मागणी केली. याची गांभिर्याने दखल घेत आयुक्त पल्लवी पाटील व आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी शहापूर नागरी आरोग्य केंद्रास भागाचा सर्व्हे करण्याच्या सुचना दिल्या. तसेच संबंधित विभागास परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. दुषित पाणी अथवा अन्नामुळे हा आजार उद्भवू शकतो.हात-पाय लुळे पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, एखादा अवयव लुळा पडणे अशी लक्षणे दिसून येतात.त्यामुळे नागरिकांनाही दुषित अन्न अथवा दुषित पाण्याचा वापर टाळावा. काही लक्षणे आढळता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजू खोत, दिपक जाधव, गोसावी, अनिल मोरे, अजय जाधव, सागर कार अवधुत खोत, शहाहुसेन मुल्ला यांचा समावेश होता.
इचलकरंजीत युवकास जीबीएस सदृश्य आजाराची लागण
