हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी, मनपाडळे रस्त्यावर वाढले अपघातांचे प्रमाण…..

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, अंबपवाडी, मनपाडळे, अंबप या गावांना जोडणारा रस्त्यावर मागील महिन्यात वारंवार अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहे.यामुळे छोट्या वाहनांना या रस्त्यावर वाहतूक करणे अडचणीचे होत आहे.

तसेच अपघातांमुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. मनपाडळे, कासारवाडी, अंबपवाडी अंबप यांना जोडणारा रस्ता मागील अनेक वर्षापासून खराब झाला होता.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २ कोटी ९६ लाख निधी लावण्यात आला. या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी मोहरी (छोटा साकव) ठेवला नाही. यामुळे पावसात अनेक वेळा त्या रस्त्यावरून पाणी वाहून रस्ता खराब झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भराव खचत आहेत. यामुळे दोन वाहने यावरून जाणे अशक्य झाले आहे.

कासारवाडी, मनपाडळे येथून क्रेशर व्यवसाय असल्यामुळे गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. यामुळे येथून जाणारा विद्यार्थी, कामगार वर्ग व शेतकऱ्यांना अपघाताला व वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. मागील एक महिन्यात तीन वेळा डंपर नाल्यात पडून अपघात झाला आहे. आठ दिवसांपूर्वी स्कूल बस नाल्यात पडली होती.

तसेच डंपर काढताना रस्ते खराब होत आहे.या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतुकीत प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिज वाहतूक होते. याकडे वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात. तर अवजड वाहतूक करणारे वाहन चालक बेदारपणे वाहन चालवत यामुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडतात.