हातकणंगले नगरपंचायतीमध्ये सुविधांचा अभाव;नागरिक त्रस्त

हातकणंगले, नागरपंचायत होऊन पाच वर्षे उलटली असली तरी हातकणंगले शहरात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लाखो रुपये खर्च करून कचऱ्याचे साम्राज्य जैसे थे आहे. कित्येक दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याचबरोबर बेशिस्त पार्किंमुळेदेखील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नेमके हातकणंगले नागरपंचायत करते तरी काय, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

हातकणंगले ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन पाच वर्षे उलटून पुन्हा प्रशासकाची नेमणूक झाली. मात्र हातकणंगले येथील समस्या काही निराकरण होत नसल्याचे चित्र दिसत आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मर्जीतील माणसांची कामे केली व विकासाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाले तर रस्त्याचा पार्किंगसाठी वापर सर्रास सुरु झाला आहे. याचबरोबर गावातील अंतर्गत रस्त्यांची ही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. रस्त्याकडेला वाढलेले गवत , पडलेला कचरा जैसे तेच राहत आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. यामुळे नागरिक अक्षरश; हैराण झाले आहेत.