इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात; रूग्णांना, नातेवाईकांना त्रास

इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे वर्ग केल्यानंतर या रूग्णालयामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रूपये देत आहे. या निधीतून रूग्णालयाचे रूपडे पालटले आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह सीमाभागातील रुग्णांसाठी सदरचे हॉस्पिटल मोठे आधार ठरले आहे. दररोज या रूग्णालयामध्ये हजार ते बाराशे रूग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे हे हॉस्पिटल गर्दीने फुलले असते.

आपल्या रुग्णांना पाहण्यासाठी नातेवाईक ही येत असतात. या नातेवाईकांना गाडी लावण्यासाठी समोरील बाजूस रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर आता अतिक्रमण झाले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी खुल्या जागेत जनरेटर उभे केले जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर गर्दी होत असल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. तेव्हा हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्याची गरज आहे. 

त्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने येथील अतिक्रमण काढून शिस्त लावुन संपूर्ण आयजीएम परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात यावे अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.