आटपाडी तालुक्यातील रुग्णांची होणार सोय!

गेल्या अनेक वर्षांपासून आटपाडी तालुक्यातील रुग्णांची होणार सोय! शेटफळे व झरे परिसरातील रुग्णांची गैरसोय होती. येथील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची करण्याची मागणी होती. गेल्या अनेक वर्षांपासून बनपुरी गावातील नागरिकांची आरोग्य उपकेंद्र व्हावी अशी मागणी होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. याबाबत विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याबाबत शासनाकडे मागणी केली होती. बुधवारी शेटफळे व झरे येथे आरोग्य केंद्र तर बनपुरी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले. याबाबतचा शासन आदेश मिळताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. शेटफळेची लोकसंख्या सुमारे दहा हजारांहून अधिक आहे.

येथील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळण्यासाठी तब्बल आठ ते दहा किलोमीटरवर जावे लागत होते. यासाठी कोणतीही शाश्वत वाहतूक व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याचबरोबर झरे येथील नागरिकांना खरसुंडी येथील आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी सुमारे २० किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा रुग्णाच्या जिवावर बेतल्याचे प्रकार घडले होते. यामुळे शासनाने विशेष बाब म्हणून येथे आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर बुधवार दि. १४ रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. या निर्णयाने शेटफळे, झरे व बनपुरीसह परिसरातील गावांमधील रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.