आटपाडीमध्ये अपघातात एक जागीच ठार, एक जखमी! वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सध्या अपघातांच्या प्रमाणात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. असच एक अपघात आटपाडीत घडला आहे. आटपाडी- दिघंची रोडवर बी. आर. वस्त्र अलंकारजवळ झालेल्या दुचाकी व चारचाकीच्या अपघातामध्ये सद्गुरू विष्णू हरिहर (वय ५१, रा. आरुष हाईट्स, आटपाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी ज्ञानेश्वर हरिहर ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात मयत सद्गुरू यांची पत्नी अनिता सद्गुरू हरिहर (वय ४४) यांनी चारचाकी चालक डॉ. तुषार मिलिंद गुळभिले (रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. शनिवारी आटपाडीचा आठवडी बाजार असतो.

या आठवडी बाजारात सद्गुरू विष्णू हरिहर हे पुतणी वैष्णवी हिला घेऊन त्यांची दुचाकी (एमएच ४५ एटी २८३८) वरून भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन परत येत असताना आटपाडी दिघंची रोडवरील बी. आर. वस्त्र अलंकार समोरील डांबरी रस्त्यावर आटपाडीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने (एमएच ४५ एएल ००८५) पाठीमागून येऊन त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली.

या धडकेमध्ये सद्गुरू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पुतणी वैष्णवी जखमी झालेली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.