आटपाडी तालुक्यातील या रस्त्यावरील खड्डा धोकादायक!

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील हायस्कूलनजीक असलेला राजेवाडी रस्त्यावरील असणारा खड्डा अपघाताला आमंत्रण देतो आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर हा खड्डा पडल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. या मार्गाने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक दूध व्यावसायिकांची नेहमीच वर्दळ असते. खड्डा पडून बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

वर्दळीच्या मार्गावरील वळणातच खड्डा असल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. या मार्गावरील खड्डा तत्काळ मुजवावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. राजेवाडी तलावातील गाळाने भरलेली अवजड वाहने या मार्गाने जात असल्याने दिघंची हायस्कूलनजीक गटारावर हा खड्डा पडला आहे. हायस्कूललगत खड्डा असल्याने तो धोकादायक बनला आहे. तो खड्डा तत्काळ मुजवावा, अशी मागणी होत आहे.