दिघंचीत १९ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा!

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतीने वितरित करावा अन्यथा दि. १९ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे दिघंची शहर अध्यक्ष बाळासाहेब औंधकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की दिघंची ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना देण्यात येणारा पाच टक्के निधी वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही देण्यात आला नाही. दिघंची ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक दिव्यांगांचा निधी अडवून ठेवलेला आहे. दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी विचारणा करण्यासाठी गेले असता खोटी आश्वासने दिली जातात.

निधीसंदर्भात दिशाभुल करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने चालविला आहे. दिव्यांग निधी तातडीने द्यावा अन्यथा १९- सप्टेंबरपासून प्रहार अपंग क्रांती संघटनेसह दिव्यांग बांधव महादेव मंदिराच्या प्रांगणात उपोषण करतील असा इशारा देण्यात आला.