इचलकरंजी आगारातून रक्षाबंधननिमित्त जादा एसटी बसेस

रक्षाबंधनाला होणारी गर्दी कॅच करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक कनिष्ठ सागर पाटील यांनी दिली.
सोमवारी १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) आहे.

या निमित्ताने बसस्थानकावर होणारी संभाव्य गर्दी विचारात घेवून प्रवाशांच्या सोयीसाठी श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक येथून यादिवशी इचलकरंजी, नृसिंहवाडी, कोल्हापूर, वडगांव, वाठार, मिरज, सांगली, निपाणी, सोलापूर व पुणे या प्रमुख मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी इचलकरंजी आगारमार्फत बसेस उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. इचलकरंजी शहर, हातकणंगले तालुका व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.