इचलकरंजीत पूरग्रस्त नागरिकांचा रास्ता रोको!जलसमाधीचा इशारा

इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिक मोठ्या संख्येने आज गांधी पुतळा चौकात एकवटले आणि रास्ता रोको आंदोलन केले. हिप्परगी आणि आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवा, आमच्या मागण्या मान्य करा, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. दोन दिवसांत हिप्परगी, आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग न वाढवल्यास ३० हजार पूरग्रस्त कुटुंबासह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आणि आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आलमट्टी व हिप्परगी धरणातील पाणी साठवण चुकीच्या नियोजनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सातत्याने महापुराचा फटका बसत आहे. त्यामुळे आवश्यक साठा ठेवून जादाचे पाणी पुढे सोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनावर दबाव आणावा. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर पूरग्रस्त भागात पाणी कमी येईल, असे अनेक वर्षापासून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी केली, पण ठोस प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे याविरोधात पुराचे पाणी घराच्या उंबरठ्यावर आले असताना संतापलेले पूरग्रस्त भागातील कुटुंबे रस्त्यावर उतरली. महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.