हातकणंगले तालुक्यातील वठार तर्फ वडगाव येथे जेवणात गुंगीचे औषध घालून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा साडेसात लाखांचा रुपयांचा ऐवज चोरी केल्याची फिर्याद महेंद्र बजरंग शिंदे यांनी वडगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.याप्रकरणी ऐश्वर्या महेंद्र शिंदे (वय २१) व ऋषिकेश राजेश भोपळे यांच्याविरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २२ जुलैला रात्री घरातील सर्वजण जेवण करण्याआधी मुलगी ऐश्वर्या हिने घरातील जेवणात गुंगी आणणारे औषध कालविले.
सर्वजण गाढ झोपी गेल्याचे पाहून घरातील पाच तोळे सोन्याच्या बांगड्या, पाच तोळे सोन्याच्या पाटल्या, पाच तोळे सोन्याचे तोडे, रोख एक लाख रुपये व एक लॅपटॉप असा सात लाख सत्तावन्न हजार रुपयांचा ऐवज घेऊन ती पळून गेली. हा प्रकार २३ जुलैला उघडकीस आला. तिची शोधाशोध केली असता सापडली नाही.
या घटनेत ऋषिकेश राजेश भोपळे याचाही सहभाग असून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मिळून आले नाहीत. अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करत आहेत.