हातकणंगलेमध्ये मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित तिरंगी लढत…

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा पार करील तो विजयाच्या दिशेने वाटचाल करील असे चित्र आहे.कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही महायुतीकडे नेत्यांची संख्या जास्त आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी संघटनात्मक बळ, आर्थिक ताकद जास्त असली तरी ती प्रत्यक्षात मतापर्यंत किती पोहोचते हे महत्त्वाचे आहे. उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याबद्दल नवीन उमेदवार म्हणून सहानुभूती आहे.

राजू शेट्टी यांनाही शेतकऱ्यांसाठी राबणारा नेता म्हणून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ते करत आहेत.
या मतदारसंघात एकूण १८ लाख ११ हजार मतदान आहे. गेल्या निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते. यावर्षी उन्हाचा तडाखा जास्त आहे. त्यामुळे ते ६५ टक्के झाले तरी ११ लाख ७७ हजार मतदान होईल. एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वंचितसह इतर २४ उमेदवारांनी ७७ हजार मते घेतली, तर ११ लाख मते राहतात. त्यामध्ये तीन प्रमुख उमेदवारांचा विचार केल्यास ३ लाख ६६ मतांची विभागणी होते; परंतु सद्य:स्थितीत ही लढत दुरंगीकडे सरकली आहे. त्यामुळेच ४ लाखांची जो उमेदवार बेगमी करील तो विजयाचा दावेदार होऊ शकतो, असे चित्र आज दिसते.