जोतिबा डोंगरावर उद्या सोमवारी नगर प्रदक्षिणा

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराभोवती तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त उद्या सोमवारी नगरप्रदक्षिणा निघणार आहे. प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतून दोन लाख भाविक सहभागी होतील, असा अंदाज आहे.त्यामुळे बंदोबस्ताचे नियोजन केल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी सांगितले. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी डोंगरावरील अष्टभैरव तसेच डोंगराभोवतीच्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी नगर प्रदक्षिणा निघते. या दिंडीत आबालवृद्धांचा सहभाग असतो. ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील नियोजन केले आहे.

सोमवारी सकाळी सातला मुख्य मंदिरातून नगरप्रदक्षणेची सुरुवात होईल. त्यापूर्वी वीणापूजन होईल. जोतिबाच्या नावानं चांगभलं..चा जयघोष होऊन नगरप्रदक्षिणा सोहळा मंदिर दक्षिण दरवाजातून बाहेर पडेल. तो गजगतीने गायमुख तलावजवळ येईल. तेथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात भाविक येतील. तेथे धार्मिक विधीनंतर डोंगरावरील बारा ज्योतिर्लिंग व अष्टतीर्थ येथे भाविक जातील. दिंडी मार्गावर भजन, कीर्तन सोहळा होईल. दिंडी मार्गावर पोलिस बंदोबस्त तसेच पाण्याचे टँकर ठेवून वैद्यकीय पथके, अधिकाऱ्यांसह अँब्युलन्सही असेल.