कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे नुकसान…..

मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात मात्र जोरदार सुरूवात केली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने दैना उडवून दिली. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, करवीर आणि कागल तालुक्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड परिसरात ढगफुटीसदृश वळीव पाऊस झाला. दरम्यान आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारपर्यंत कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असे चित्र आहे. अधून-मधून सायंकाळच्यावेळी वळीव स्वरूपाचा पाऊसही कोसळत आहे. आज सकाळपासूनच कडक ऊन होते. सायंकाळी चारच्या सुमारास काळे ढग जमा होऊन गडगडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली.शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात झालेल्या पावसाने शेती पिकाचेही नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी ओढ्यांचे पाणी शेतात शिरले होते. तर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गडहिंग्लज तालुक्यातील किल्ले सामानगड परिसरात सायंकाळी ढगफुटीसदृश वळीव पाऊस झाला. डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे चन्नेकुप्पी व हुनगिनहाळ ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. दरम्यान, चन्नेकुप्पी ओढ्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प राहिली.गडहिंग्लज आणि परिसरातही चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अर्धा तासभर पाऊस पडला. त्यानंतर थांबलेला पाऊस साडेसहाच्या सुमारास पुन्हा सुरू झाला, तो उशिरापर्यंत रिपरिप स्वरूपात पडत राहिला. या पावसामुळे माळरानावरील भात, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे. कडक उन्हाने भेगाळलेल्या जमिनीची तहान या पावसाने भागविली.कोल्हापूर शहरात दुपारी चारच्या सुमारास पावसाची मोठी सर येऊन गेली.

कडाक्याच्या उन्हामुळे गरम झालेले वातावरण काहीसे थंड झाले. लाईन बाजार, शुगरमील, उलपे मळा, पोस्ट ऑफिस, रमण मळ्यात ढगांच्या गडगडाटासह जवळपास तासभर पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले.दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारणी सुरू आहे. सजीव देखाव्यांचे साहित्यही येऊन पडले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे येथे काम करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. कायम वर्दळ असलेला बावड्याच्या मुख्य रस्ता शांत होता. विक्रीसाठी बाहेर काढलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती झाकून ठेवण्यात व्यापारी गडबड करताना दिसले.