5 सप्टेंबर शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत घेण्यात आला. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठची सभा शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आमरण उपोषणातील शिक्षकांची प्रकृती खालावत चालली आहे. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक, खासगी प्राथमिक, महापालिका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जाणार आहे. आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठांतर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ, मुख्याध्यापक संघ यासह जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहेत. यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संतोष आयरे, भरत रसाळे, गजानन काटकर, सुनील कल्याणी उपस्थित होते.