राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. हातकणंगले मतदारसंघात राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील उभी फूट, यातून दुभंगलेले कार्यकर्ते, मतदार संघात असणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य, विद्यमान काँग्रेसच्या आमदाराने बसवलेली घडी आणि भाजपने सुरू केलेली धडपड पाहता या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच होणार, असे पहायला मिळत आहे. सर्वच पक्षात राजकीय अस्तित्वासाठी पक्षांतर्गत मतभेद, विरोध बाजूला ठेवून मोर्चे बांधणी सुरू आहे.
जनसुराज्य पक्षाचे नेते व भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून दलितमित्र अशोकराव माने यांनी गाव आणि गाव पिंजून काढले आहे. भाजपमधूनच अॅड. अलका स्वामी यांचेही नाव चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे अविनाश भणगे तयार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. आरपीआयचे राज्य सचिव मंगलराव माळगे यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी अजूनही आशा सोडली नाही. ताराराणी विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार प्रकाश आवाडे यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. यामुळे ते महायुतीला सढळ हाताने मदत करणार की मर्जीतील कुणाला रणांगणात उतरवणार याचे उत्तर काळच ठरवेल मात्र खरी लढत तिरंगीच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी झाली तर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार की शिवसेना उद्धव ठाकरे गट यावर दावा करणार हे आता पहावे लागेल. यामुळे अंतर्गत दुफळी आणि पक्षाशी फारकत घेऊन अपक्ष उमेदवार या गोंडस नावाखाली लढाई होणार हे सर्वश्रुत आहे. तर भाजप व शिवसेना शिंदे गट या मतदारसंघावर दावा करणार का ? हे पहावे लागेल.