हेरलेत डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन……

हेरले येथे शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व पर्यावरण पूरक साजरा करावा. असे आवाहन शिरोली पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी यांनी केले. ते येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच बाजीराव पाटील हे होते. ते म्हणाले, गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.

तसेच जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही याचीही दक्षता घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पर्यावरण पूरक व अन्य कोणत्याही गोष्टीतून कोणत्याही समाजाचे मन दुखावणार नाही अथवा इजा पोचणार नाही. याची खबरदारी मंडळांनी घेणे आवश्यक आहे. मिरवणूक मार्गात परस्पर कोणीही बदल न करता ठरवून दिलेल्या मार्गावरुनच मिरवणूक गेली पाहिजे. तसेच शासन व न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे गिरी यांनी सांगितले.