शिरोलीतील हजार विद्यार्थ्यांचा सवाल : जीव धोक्यात घालून शाळेला करतात ये-जा

गेल्या १७ वर्षांपासून फक्त शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आहे. महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला शिवाजीनगर, यादववाडी, व्यंकटेशनगर, चौगुले मळा, मेनन कॉलनी आदी सुमारे २० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे, तर पश्चिम बाजूला माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.

या १७ शाळांत दररोज एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी जीव मुठीत धरून येतात आणि जातात. पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महाडिक बंगल्याजवळ, शिरोली पाण्याची टाकी याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे. भुयारी मार्गच नसल्याने शिरोलीतील हजारो विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज पूर्व-पश्चिम असा महामार्ग ओलांडावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे.विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसरत कधी थांबणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सहापदरीकरणात याठिकाणी भुयारी मार्ग धरला नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे.