विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय नेतेमंडळींनी आपले राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्याच भाजपा, शिवसेना (शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे; मात्र असे असले तरी मतदारसंघात तिन्ही पक्षाचे इच्छुक निवडणूक लढवणारच असल्याचे जाहीर करत पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला आहे.
भाजपाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, शिवसेना शिंदे गटाकडून दिवंगत आमदार अनिल बाबर याचे पुत्र सुहास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दंड थोपटले आहेत; मात्र महायुती एकसंघपणे लढल्यास कोणाच्या तरी एकाच्या पारड्यात तिकीट जाणार आहे. इच्छुकांपैकी एक नेता शरद पवार यांच्या गटात जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे; मात्र कुण्या एकाला बंडखोरी करावीच लागणार आहे.
शिवसेनेचे सुहास बाबर यांनी महायुतीचे तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचे जाहीर करत विरोधकांना वेगळ्या पक्षातून किंवा अपक्ष लढण्याचा एक प्रकारे संदेशच दिला आहे. दरम्यान, बंडखोरी कोण करणार व ती बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार ? याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मैदानात उतरा कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका असे सांगत अप्रत्यक्षपणे लढण्याचा सल्ला दिला. यामुळेच ब्रह्मानंद पडळकर यांनी विधानसभा लढणार असल्याचे सांगत गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. खानापूर तालुक्यातून दोन उमेदवार व आटपाडी तालुक्यातून एक उमेदवार झाल्यास आटपाडी तालुक्यातील उमेदवाराचे पारडे जड ठरणार असल्याचे बोलले जात आहे.