लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार ४००० रुपये? CM शिंदेंनी ठेवली एक अट

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रकाशझोतात आली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. “ही योजना मतं मिळवण्यासाठी सुरु केली नाही.महिलांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण माझी लाडकी बहीण योजनेमुळं विरोधी पक्ष घाबरला आहे. महिलांनी महायुती सरकारला आणखी मजबूत केलं पाहिजे, ज्यामुळे योजनेचा मासिक भत्ता ४ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो, असं शिंदें यळतमाळमध्ये या योजनेच्या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.


शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजना मतं मिळवण्यासाठी सुरु केली नाही. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. लाडकी बहीण योजनेमुळं विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. सरकारकडून महिन्याला फक्त १५०० रुपये दिले जात आहे. सरकार एव्हढ्यावरच थांबणार नाही. महिलांनी महायुती सरकारला मजबूत केलं पाहिजे.
जेणेकरून या योजनेची रक्कम ४ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. जर काँग्रेस सत्तेत असती, तर भष्ट्राचारामुळं लोकांना ३ हजार रुपयांऐवजी फक्त ४०० रुपयेच देण्यात आले असते. पण महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे. महिलांना लखपती बनवायचं आहे”. बदलापूर प्रकरणात विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोपही शिंदेनी यावेळी केला.


बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलनकर्त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या पूर्ण केल्या. परंतु, विरोधकांनी हे आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत शिंदेनी विरोधकांचा समाचार घेतला. या कार्यक्रमात फडणवीसांनीही विरोधकांना धारेवर धरलं. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरु करुन लोकांना खरेदी करण्याचं काम सरकार करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.या योजनेच्या माध्यमातून १० टक्के महिलांनाही लाभ मिळणार नाही, असा दावा विरोधकांनी केला होता. पण १.५ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. तसच महिलांची सुरक्षाही निश्चित केली आहे. महाराष्ट्र सरकार बदलापूरच्या प्रकरणात कडक कारवाई करत आहे आणि शाळांमध्ये समुपदेशन सुरु केलं आहे.