हातकणंगले तालुका काँग्रेस आय व वडगाव शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने १ लाख ११ हजार १११ रुपये बक्षिसाची दही हंडी नगरपालिका चौकामध्ये गुरुवारी (ता.२८) आयोजित केली आहे, अशी माहिती आमदार राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वडगांव शहर काँग्रेस व सचिन चव्हाण युवाशक्तीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चार वाजता पालिका चौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमास माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव आवळे, माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मुंबईतील प्रसिद्ध मॅजीक ग्रुप डान्स शो, ढुलकीच्या तालावर फेम प्रिया लासकर, डान्स इंडिया डान्स फेम वैष्णवी, रत्नागिरी लावणी स्पेशल दिव्या दळवी, रिल स्टार बल्लू सनी व सिध्दी यांचा कार्यक्रम होईल. वडगावातील तालीम मंडळांच्या जुन्या काळातील गोविंदांचा सत्कारही यावेळी होईल. यावेळी सचिन चव्हाण, कपिल पाटील, चेतन चव्हाण, नितीन सणगर उपस्थित होते.
