हातकणंगलेतून तिकीट मिळवण्यासाठी महाविकास आघाडी- महायुतीकडे इच्छुकांची उमेदवारीची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघात पक्षांच्या मतदार याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. अशातच हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अनेकांकडून उमेदवारीची मागणी केली जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी, काँग्रेस यांची राज्यात महाविकास आघाडी आहे. या तीनही पक्षाच्या इच्छुकांनी हातकणंगले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. काँग्रेसचे राजू बाबा आवळे विद्यमान आमदार आहेत त्यांना वडील जयवंतराव आवळे यांच्याकडून राजकीय वारसा लाभला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कोट्यवधींचा निधी आणून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे केली आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी परिस्थिती आहे.

शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी सलग दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या काळात त्यांनी अगदी खेड्यापाड्यांपासून वाड्या वस्त्यापर्यंत विकास कामे केली आहेत. माजी जिल्हापरिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माने यांनी मागच्या निवडणुकीत प्रथमच निवडणूक लढवून सुद्धा चांगली मते घेतली होती. मात्र ते विजयापर्यंत पोहोचू शकले नव्हते. प्रत्येक नेत्याबरोबर सलोख्याचे संबंध त्यांनी ठेवलेले आहेत. याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होईल. मात्र त्यांना उमेदवारी भाजपा पुरस्कृत जनसुराज्य म्हणून मिळणार की भाजपाच्या चिन्हावर लढवून त्यांना जनसुराज्य पुरस्कृत करणार हे अद्याप वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. हा निर्णय विनय कोरे घेतील यावर त्यांच्या हातात कोणता झेंडा येईल यावर लवकरच निर्णय होईल.

गत निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेसचे उमेदवार राजूबाब आवळे यांच्याबरोबर होती. त्यांच्या मतांचा त्यांना विजयापर्यंत नेण्यात मोठा वाटा होता. मात्र या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष वैभव कांबळेही निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी जोमाने प्रयत्न चालू केले आहेत. स्वाभिमानी स्वतंत्र अथवा तिसऱ्या परिवर्तन आघाडी कडून लढण्याच्या तयारीत आहेत.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी अद्याप कोणत्याही उमेदवारांची नावे जाहीर केली नसल्याने सर्व इच्छुक उमेदवार चिंतेत आहेत. उमेदवारी आपल्याच पदरात पडावी यासाठी पक्षप्रमुख व पक्ष श्रेष्ठींच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र राजकीय पक्षांनी वरिष्ठ पातळीवर आघाड्या आणि युती केल्याने अनेक इच्छुकांच्या इच्छेवर विरजण पडणार आहे.

यामुळे आयत्यावेळी कोणता झेंडा घेऊ हाती अशी एकंदरीत मतदारसंघात परिस्थिती आहे. या मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच निवडणूक तिरंगी की चौरंगी होणार हे निश्चित होईल. सध्या तरी प्रत्येकाची धाकधूक वरिष्ठांनी  वाढवलेली आहे.