मोहम्मद शमीची अखेर टीममध्ये एन्ट्री….

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. मोहम्मद शमी शेवटचा वनडे वर्ल्डकप 2023 खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. नोव्हेंबर 2023 पासून मोहम्मद शमी मैदानात उतरलेला नाही. आता जवळपास 9 महिन्यांच्या कालावधीनंतर शमीने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. असं असताना त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशांतर्गत हंगामासाठी बंगालच्या 31 सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच मोहम्मद शमी रणजी स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. बंगाल संघातून मोहम्मद शमी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. शमी 11 ऑक्टोबरला युपी विरुद्ध रणजी स्पर्धेत उतरू शकतो. त्यानंतर बंगलाचा दुसरा सामना 18 ऑक्टोबरला बिहार विरुद्ध आहे. हा सामना कोलकात्यात होणार आहे. शमी या दोन पैकी एका सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याची धडपड असेल. तर टीम इंडिया 19 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध संधी मिळाली नाही तर या मालिकेतून मोहम्मद शमीचं पुनरागमन होऊ शकतं. जर दोन्ही मालिकेत तसं झालं नाही तर मग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नजर असेल. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे

बंगालने 31 खेळाडूंच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफचंही नाव सहभागी केलं आहे. त्याचबरोबर वृद्धिमान साहा देखील या यादीत सहभागी आहे. वृद्धिमान साहा थोड्या काळासाठी त्रिपुराला गेल्यानंतर बंगालबरोबर पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज आहे.