हातकणंगलेत आढावा बैठक गणेशोत्सवात मंडळांनी नियमांचे पालन करावे…

गणेशोत्सव कोणत्याही मंडळांने शासनाने ठरवून दिलेले नियम मोडून डॉल्बी लावू नये. नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल याची दक्षता सर्व गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी तसेच गणेशोत्सव काळामध्ये कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवू नयेत अथवा पोस्ट पाठवू नयेत, असे आवाहन जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी रोहिणी सोळंके यांनी केले.

हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये आगामी गणेश चतुर्थीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३० ते ३५ गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी गणेश आगमनावेळी व विसर्जनावेळी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. गणेशोत्सव काळामध्ये कोणतेही बॅनर्स, पोस्टर्स व्हिडिओसह
अन्य पथनाट्य, नाटीका प्रसारित करताना पोलीस स्टेशनची पूर्वपरवानगी घेण्यात यावी, असे सांगितले. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले. बैठकीचे नियोजन गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी केले होते.