हुपरी परिसरातील सिटी सर्व्हेचा अहवाल सादर करा….

हुपरी परिसरातील भागाचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नाही. याची प्रत्यक्ष पाहणी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजी अप्पर तहसीलदार व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना दिल्याने हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या मागणीला यश आले आहे. गेली ५७ वर्षे प्रलंबित असलेला मालकी हक्काच्या मिळकतीचा प्रॉपर्टी कार्डाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन व हुपरी येथील छ.शिवाजीनगरमधील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मिळकती अधिकृत कागदोपत्री नोंद करण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यानी बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्ष मोहन खोत यांनी सिटी सर्व्हे प्रश्नी सविस्तर बाजू मांडली.

परिसरातील रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगूड, तळदंगे, इंगळी, रणदेवीवाडी, सांगाव तसेच रांगोळी या गावात चांदीचे दागिने तयार करण्याचा हस्तकला उद्योग व कापड निर्मितीचा यंत्रमाग व्यवसाय चालतो. तसेच जवाहर साखर कारखाना, व्यंकटेश सूत गिरणी व फाईव्ह स्टार पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे अनेक कुशल, अकुशल कारागीरांच्या हाताला काम मिळत आहे. गेल्या काही वर्षापर्यंत ग्रामपंचायत असेसमेंट उताऱ्यावर नोंद असलेल्या स्थावर मालमत्तावर बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाने मिळत होते.

प्रॉपर्टी रीतसर खरेदी विक्री करता येत होत्या. शिवाय गावातील सर्व बँका सदर प्रॉपर्टी तारण घेऊन कर्ज पुरवठा करीत होत्या. पण सध्या वाढीव वस्त्यांचा सिटी सर्व्हे न झाल्याने कर्जपुरवठा केला जात नाही.दरम्यानच्या काळात चांदी उद्योगासह इतर उद्योगधंद्यामुळे गावच्या लोकसंख्येत दुप्पट, तिप्पट वाढ झाली आहे. सध्या सिटी सर्व्हे न झाल्यामुळे या गावातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.