सर्वत्र मांगल्य आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या बुद्धीची दैवत आणि अबालवृद्धांना अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर आणि परिसरात मोठी लगबग सुरू झाली आहे, सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वांचीच तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्या दृष्टीने त्यांनी तयारी आणि नियोजन सुरू केले आहे.
गणेशोत्सव शांततेत तसेच कायदा व सुव्यस्थतेचा भंग न होता आदर्शरितीने साजरा व्हावा या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मंडळांनी मंडपस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापासून इतर खबरदारीबाबत सूचना केल्या. तसेच रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद होतील, असा इशारा दिला आहे.
लोंबकळणाऱ्या तारा हटविण्याची सूचना वीज विभागास करावे असे आवाहन करण्यात आले आहे, सर्व सार्वजनिक मंडपस्थळी अग्निशमन यंत्र बसविण्याबरोबरच मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांची नावे द्यावी, जेणेकरून अग्रिशमन यंत्रणा आपत्कालीनवेळी कशाप्रकारे हाताळायची याची प्रात्यक्षिके देता येतील या साठी तयारी केली जात आहे. गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याची काळजी घ्यावी.
तसेच रात्री १० नंतर मोठ्या आवाजात डिजे किंवा लाऊड स्पीकरचा वापर केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही याचे मंडळांनी पालन करावे. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल होतील. त्यामुळे साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्याचे आवाहन पोलीस खात्याने मंडळांना केले आहे. इचलकरंजी शहरातील गावभाग शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध परवाने घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
त्यानुसार पोलीस खात्याने ऑनलाइन लिंक दिली असून त्या लिंक द्वारे मंडळांना अर्ज करता येणार आहे विविध विभागांच्या परवानग्या ना हरकत दाखला घेतल्यानंतर एक खिडकी योजनेच्या माध्यमातून अखेरिस पोलिसांची परवानगी देण्यात येणार आहे ऑनलाइन लिंक द्वारे सार्वजनिक मंडळांनी देखील परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.