इचलकरंजीतून रात्री दहानंतर कोल्हापूर व सांगली मिरज मार्गावर एसटी बसेस फे-या बंद केल्याने रात्री उशिरा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील रात्रीच्या फे-या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली. शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. याबाबत आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. तर तातडीने याबाबत या मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. इचलकरंजीतून कोल्हापूर व सांगली मिरज मार्गावर रात्री उशिरापर्यंत एसटी बसेसची ये-जा सुरू असते.
त्यामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात असणारा नोकरदार तसेच मिरज रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी व्यापारी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या प्रवाशांसाठी एसटीची सुविधा अत्यंत उपयुक्त होती. मात्र गेल्या कांही दिवसांपासून रात्रीनंतर या मार्गावरील एसटी बसेसच्या फे-या बंद केल्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्या फे-या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी महिला शहराध्यक्ष अश्विनी कुबडगे, राजेश रजपुते, नागुताई लोंढे, योगीता दाभोळे, नीता भोसले, कौशल्या गाडे, दीपक पाटील, सचिन माळी, अभय बाबेल, माधवी मुंडे, उमा जाधव, वंदना शिंदे, संगीत घोरपडे, अलका विभुते, विद्या केसरे, प्रमोद पाटील उपस्थीत होते.