शरद पवारांचा उद्यापासून चार दिवस कोल्हापुरात मुक्काम; विधानसभेच्या तोंडावर जोडण्या लावणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar In Kolhapur) उद्यापासून (2 सप्टेंबर) तब्बल चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये शरद पवारांचा कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीचा कार्यक्रम असणार आहे.

भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात दबदबा असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.3 सप्टेंबर रोजी कागलमध्ये गैबी चौकामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगे तुतारी फुंकणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून समरजित घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकाधिक दमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत.