आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मेळावे तसेच सभांचे आयोजन देखील सुरू आहे. बोरगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. महादेव मळा ते बोरगाव, बोरगाव ते पंचक्रोशी हायस्कूल, बोरगाव ते नवे बोरगाव व बोरगाव ते आळते रस्ता करणे या कामांचे उद्घाटन करण्यात आले.
स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना विसापूर सर्कल या परिसराने सलग दोन निवडणुकीत मोलाची साथ दिली. आमदार भाऊंनी देखील विसापूर सर्कलमधील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपणासमोर येत असलो तरी मलाही सर्व स्तरातून पक्ष, गट-तट विसरून लोक पाठबळ देत आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी जनतेचा उमेदवार असल्याचे तीव्रतेने जाणवत आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय भाऊंच्या प्रमाणेच हा परिसर मलाही साथ देईल याची पूर्ण खात्री व विश्वास आहे. विसापूर सर्कलच्या विकासाच्या सर्व संकल्पना पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. राजकीय पक्ष, गट तट विसरून अनिलभाऊंनी येणाऱ्या व्यक्तीचे काम कसे होईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
आज स्वर्गीय भाऊंच्या पश्चात तुम्ही जे प्रेम मला देत आहात त्यामुळे मी भारावून जात आहे. राजकारणात पावलोपावली ही कृतज्ञता ठेवून मी वाटचाल करीन असेही बाबर यांनी यावेळी सांगीतले.